अप्रतिम विनोदी शैलीने मराठी रंगभूमी समृद्ध करणारे प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांशी असलेलं आपुलकीचं नातं आजही तितक्याच आत्मीयतेने जपलंय – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे येथे मराठी रंगभूमीवर विक्रमादित्य म्हणून अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या १३३३३ व्या प्रयोगानिमित्त दैनिक सकाळ तर्फे आयोजित विशेष सत्कार समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले. आपल्या अविस्मरणीय कलेने, सहजसुंदर अभिनयाने आणि अप्रतिम विनोदी शैलीने मराठी रंगभूमी समृद्ध करणारे प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांशी असलेलं आपुलकीचं नातं आजही तितक्याच आत्मीयतेने जपलं आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, प्रशांत दामले यांच्या पत्नी गौरी दामले, ‘पल्लोड’चे मालक सुरेश पल्लोड, रुपेश पल्लोड, ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’चे मुख्य आर्थिक व कार्यपालन अधिकारी आदित्य मोडक, ‘सकाळ’चे मुख्य विपणन अधिकारी रुपेश मुतालिक, तसेच नाट्यक्षेत्रातील मान्यवर कलाकार आणि असंख्य नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांचा वैयक्तिक विक्रमी १३,३३३ वा प्रयोग रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात सादर केला. सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘हाऊसफुल्ल प्रशांत दामले महोत्सवा’ची सांगता या प्रयोगाने झाली. या प्रयोगावेळी प्रशांत दामले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, दामले यांनी ४२ वर्षांच्या कारकिर्दीत १३,३३३ प्रयोग केले. यासाठीची ऊर्जा त्यांनी कुठून आणली, असा प्रश्न पडतो. या ऊर्जेचे रहस्य आमच्यासारख्या राजकारणातील व्यक्तींनाही सांगा. राजकारणात मनाविरुद्ध एखादी घटना घडली; तर आम्हालाही अभिनय करावा लागतो. हा अभिनय अधिक कसदार होण्यासाठी राजकारण्यांना शिकवावा, अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली. दामले यांच्या संवेदनशीलतेला सलाम, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारची स्वस्त दरातील नाटक योजनाआपल्या कला-संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने येत्या वर्षभरात राज्यातील सर्व भागातील सर्व प्रकारच्या सभागृहांमध्ये मराठी नाटके ५० रुपयांमध्ये दाखवले जातील, अशा योजनेची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केली. कलाकारांना नाटकाचे पूर्ण मानधन दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची मदत देण्याचा निर्णय यावेळी जाहीर केला. या रकमेचा धनादेश दामले यांनीआशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.