महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात ‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047’ या उद्दिष्टाच्या दिशेने विद्यापीठांनी ठोस पावले उचलावीत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : मुंबई विद्यापीठ येथे ‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047’ आणि ‘उच्च शिक्षण शैक्षणिक परिवर्तन : विद्यापीठांची भूमिका व योगदान’या विषयांवर महत्त्वपूर्ण परिषद संपन्न झाली. या परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनात्मक उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात ‘विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047’ या उद्दिष्टाच्या दिशेने विद्यापीठांनी ठोस पावले उचलावीत, तसेच प्राध्यापक भरती प्रक्रिया, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढीसाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील १५ दिवसांत पूर्णपणे परिपूर्ण करावा असे निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.
या प्रसंगी उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.