महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळ्याचे आयोजन
पुणे : सप्टेंबर २०२५ मध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. जनजीवन विस्कळीत झालेल्या या संकटाच्या काळात पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक महाविद्यालयांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला.
या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय, पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकटातून संकल्पाकडे’ या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित या सन्मान सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांच्या कार्याचा गौरव केला.
या वेळी बोलताना पाटील यांनी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांच्यासोबत खारीचा वाटा उचलण्यासाठी सक्षम, संस्कारी आणि सशक्त पिढी घडविण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालिका डॉ. अर्चना बोऱ्हे, डॉ. प्रशांत मगर, प्रो. ए. सोसायटीचे कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, मॅाडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे तसेच विविध संस्थांचे संचालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.