‘पुणे पुस्तक महोत्सव’ यंदा १३ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मांडव पूजन संपन्न
पुणे : पुणेकरांच्या साहित्यिक परंपरेला समृद्ध करणारा आणि वाचनसंस्कृतीला नवी ऊर्जा देणारा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ यंदा १३ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मांडव पूजनाने करण्यात आला.
‘पुणे शहराची ओळख आता केवळ शैक्षणिक राजधानीपुरती मर्यादित न राहता, ती पुस्तकांची, विचारांची आणि संस्कृतीची राजधानी म्हणून अधिक दृढ होत आहे’, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. पुस्तक महोत्सवासारख्या उपक्रमांमुळे साहित्यविश्वात पुण्याची ओळख एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून निर्माण होत आहे, असेही पाटील पुढे म्हणाले.
पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात भारतीय भाषांमधील पुस्तकांची ८०० दालने असतील. लिटरेचर फेस्टिव्हल, बालकांसाठी चिल्ड्रेन कॉर्नर, लेखकांसाठी ऑर्थर कॉर्नर आणि दररोज पुस्तकांची प्रकाशने होणार आहेत. खवय्यांसाठी ३०हून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील. महोत्सवाची सांगता २१ डिसेंबरला होणार आहे.
या कार्यक्रमास रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडगाव, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, अभिनेते प्रवीण तरडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक विशाल चोरडिया, लोकमान्य मल्टीपर्पजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, डॉ. यशराज पाटील, कृष्णकुमार गोयल यांच्यासह मान्यवर आणि असंख्य पुस्तकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.