शिराळा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंह नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
सांगली : शिराळा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंह नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी शिराळ्याचे श्रद्धास्थान आई अंबाबाई यांच्या चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आला. आई अंबाबाईच्या कृपेने आगामी निवडणुकीत शिराळा नगर परिषदेतही महायुतीचाच विजयी झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे हे सर्व शिलेदार जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतील.महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजय मिळाल्यानंतर सर्वांसाठी उपलब्ध, उत्तरदायी आणि विकासाभिमुख राहील, याची ग्वाही यावेळी बोलताना पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, आ. सत्यजित देशमुख, भाजपा सांगली महापालिका प्रभारी शेखर इनामदार, शिराळा भाजपा मंडल अध्यक्ष कुलदीप कदम, जिल्हा सरचिटणीस सुखदेवतात्या पाटील, तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.