मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकन उंचावण्यासाठी तसेच राज्यस्तरीय SIRF पोर्टल विकसित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न
मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकन उंचावण्यासाठी तसेच राज्यस्तरीय SIRF पोर्टल विकसित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यातील विद्यापीठांची NIRF तसेच जागतिक रँकिंग अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत वाढ करणे, दर्जेदार व आधुनिक शिक्षण देणे, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणारी संशोधन प्रकाशने करणे तसेच NAAC मानांकन सुधारण्यासाठी तातडीने कार्यवाही करणे या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.
बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, आणि ICT मुंबईचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.