‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती दालनास सावंत कुटुंबियांनी दिली सदिच्छा भेट… हे स्मृतीदालन पाहून सावंत कुटुंबियांनी व्यक्त केलेले समाधान ही आमच्यासाठी मोठी प्रेरणा – मंत्री चंद्रकांत पाटील

13

कोल्हापूर : ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या जन्मगावी आजरा येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्मृती दालनास सावंत कुटुंबियांनी सदिच्छा भेट दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना या स्मारकासाठी ६० लाख रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला होता. या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, पत्रकार समीर देशपांडे, तसेच मृत्युंजय प्रतिष्ठानचे संस्थापक, साहित्यिक–संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी मोठे योगदान दिले आहे.

काही महिन्यांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत या स्मृती दालनाचे उद्घाटन संपन्न झाले. शिवाजीराव सावंत हे काही काळ मेन राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे शॉर्टहॅण्ड शिक्षक म्हणून कार्यरत होते, त्याच स्मृतीस्थळाशी नाते जोडत हे दालन साकारण्यात आले असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सावंत यांच्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी क्षण, साहित्यसंपदा, ग्रंथनिर्मिती, पत्रव्यवहार, तसेच मिळालेले सन्मान यांची दुर्मिळ छायाचित्रे, म्युरल्स व पेंटिंग्ज अशा वैविध्यपूर्ण स्वरूपात येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. सोमवारी सावंत कुटुंबियांनी हे स्मृतीदालन पाहून व्यक्त केलेले समाधान ही आमच्यासाठी मोठी प्रेरणा असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.