सांगली येथे विद्यार्थी विभागाचे ६५ वे राज्य कला प्रदर्शन – मंत्री चंद्रकांत पाटील

16

मुंबई : मंत्रालय येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासनमान्य अशासकीय १९ अनुदानित कला संस्थांच्या प्राचार्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग व विद्यार्थी विभाग अशा दोन विभागात स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येते. विद्यार्थी विभागाचे प्रदर्शन यावर्षी सांगली येथे फेब्रुवारी 2026 मध्ये तर कलाकार विभागाचे राज्य कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे 10 ते 16 मार्च 2026 या कालावधीत आयोजित केले जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव संतोष खोरगडे तसेच अनुदानित कला महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्यातील विद्यार्थी व कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या प्रतिभाशक्तीला हक्काचा मंच उपलब्ध करून देण्यासाठी कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. दरवर्षी राज्यात विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना संधी मिळावी आणि कला संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात हे प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगली येथे फेब्रुवारी 2026 मध्ये होणार असून राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृती सांगलीकरांसाठी उपलब्ध असणार आहेत.

राज्य कला प्रदर्शनांतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्कार व गौरव मानधनाच्या रकमेत दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे कलाकार व विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यातील कला शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कला शिक्षणाची पुनर्रचना, राज्यात स्वतंत्र ललित कला विद्यापीठ स्थापन करणे या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.