नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत जत नगरपालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल – मंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जतमधील नागरिकांशी संवाद साधला. जत विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा भारतीय जनता पक्षावर असलेला विश्वास आणि मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा अत्यंत आनंददायी असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले. याच दृढ पाठिंब्याच्या जोरावर या निवडणुकीतही जत नगरपालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पाटील म्हणाले, तरीही आत्मविश्वासाबरोबरच जबाबदारीची जाणीव ठेवत, पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन संपर्क वाढवावा, नागरिकांना भाजपाच्या विकासपर अजेंड्याची माहिती द्यावी आणि अधिकाधिक मतदानाची खात्री करावी, अशा मार्गदर्शक सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. या दौऱ्यात अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक वाढवली आहे. नवीन सहकाऱ्यांचे पाटील यांनी पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास आमदार आ. गोपीचंद पडळकर, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सांगली जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडीक, महापालिका प्रभारी शेखर इनामदार, जत नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. रविंद्र अरळी, परशुराम मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.