पुण्यनगरीचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संयोजनातून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न
पुणे : पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आणि पुण्यनगरीचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संयोजनातून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा सांगता सोहळा गुरुवारी प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उपस्थित राहून सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, रा.स्व.संघ प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, खासदार मेधाताई कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, अर्जुन पुरस्कार विजेत्या रेखा भिडे, मनोज पिंगळे, श्रीरंग इनामदार, ध्यानचंद पुरस्कार सन्मानित नितीनजी दुर्तने यांसह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांनी संघटन कौशल्य दाखवून कोणताही गोंधळ, गडबड होऊ न देता या सपर्धा पार पाडल्या. जागतिक, राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत पदक मिळाल्यानंतर राज्य सरकारकडून मोठ्या रकमेची बक्षीस, शासकीय नोकरी दिली जाते आहे. त्यामुळे खेळामध्ये सहभाग घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील क्रीडा क्षेत्रातील कौशल्य जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.
मुलांना खेळासाठी पाठिंबा द्या असं आवाहन करत अक्षय कुमार म्हणाले, ‘खेळाडूंआधी पालकांचे आभार. त्यांनी मुलांना खेळासाठी पाठिंबा दिला. माझे वडील मला नेहमी म्हणायचे. सकाळी लवकर उठ, रात्री लवकर झोप. तो मंत्र मी आजही पाळला आहे. उत्तम आरोग्य सर्वांत जास्त गरजेचे आहे.’ या वेळी ४४ हजार खेळाडू क्रीडा महोत्सवात सहभागी झाले. पुढच्या वर्षी एक लाख खेळाडूंचा यात सहभाग असायला हवा’, असेही त्यांनी म्हटले.

विकसित भारत हा बलवान असला पाहिजे. त्यासाठी फिट इंडिया, क्रीडा महोत्सव पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ३७ क्रीडा प्रकारांत २९ ठिकाणी स्पर्धा घेतल्या. यात ४४ हजार खेळाडू सहभागी झाले. याबाबत सर्व खेळाडू, संघटनांचे आभार. पुण्याला क्रीडा संस्कृतीची वैभवशाली परंपरा आहे. ते समृद्ध करणे. ते वाढवणे हा या स्पर्धा आयोजनामागील उद्देश होता. या स्पर्धांमधून आणि तुमच्यातूनच भविष्यातील अंजली भागवत, शांताराम जाधव होतील. आज शहराचे नेतृत्व केले, उद्या राज्याच्या नेतृत्व कराल, देशाचे नेतृत्व कराल.’ हा जगन्नाथाचा रथ ओढवून नेणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे, अशी भावना यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.