भोर नगर परिषद निवडणुकीत भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा उत्साहात संपन्न

48

पुणे : भोर नगर परिषद निवडणुकीत भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. भोर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार संजय जगताप व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ‘जाहीर सभेत’ फडणवीस यांनी जनसमुदायाला संबोधित केले.

या सभेला आ. योगेश टिळेकर, भाजपाचे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे, भोर नगर परिषद प्रभारी राजेंद्र आबा शिळीमकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप तसेच भाजपा महायुतीचे मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सभेला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त, अभूतपूर्व प्रतिसाद पाहता भोर नगर परिषदेवर भाजपा महायुतीचा विजय निश्चित आहे, याबद्दल तिळमात्र शंका नाही, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेल्या भोर या नगरीत येण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले, याचा खूप आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आपल्याला हिंदवी स्वराज्याचे इतके सुंदर किल्ले लाभले आहेत. त्यामुळे या किल्ल्यांच्या माध्यमातून, इथल्या जैवविविधतेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि विकासाच्या उत्तम संधी निर्माण करण्यासाठी आपले सरकार विविध उपक्रम हाती घेईल.

फडणवीस पुढे म्हणाले, आपले सरकार हे जनसामान्यांचे सरकार आहे, म्हणून भोरच्या जनतेच्या विकासाला घेऊन ज्या संकल्पना आहेत, त्या सर्व संकल्पना आम्ही पूर्ण करू. राजगड कारखाना हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या कारखान्याला आपल्या सरकारने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे, त्याचबरोबर येत्या अधिवेशनात एमआयडीसीच्या निर्मितीची बैठक घेऊन तिथे उद्योग आणू आणि भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ. भोरच्या जनतेला एवढेच सांगणे आहे की, उद्या होणाऱ्या निवडणुकीत तुम्ही आमच्या उमेदवारांना निवडून द्या. पुढची 5 वर्ष तुमच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.