आळंदीकरांनी आमच्या उमेदवारांना निवडून द्या, पुढची 5 वर्ष आम्ही आळंदीच्या जनतेच्या विकासाची काळजी घेऊ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिवसभर प्रचार सभा घेण्यात व्यस्त आहेत. आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र श्री क्षेत्र आळंदी नगर परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा संपन्न झाली. या सभेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार उमाताई खापरे, आमदार महेश लांडगे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे, सदाशिव खाडे, तुषार भोसले, राम गावडे, प्रिया पवार यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विठू-माऊली कृपेने आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने आळंदी नगर परिषदेवर भाजपाचा विजयाचा भगवा नक्कीच फडकेल, असा पूर्ण विश्वास असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ‘विजयी संकल्प सभेत’ देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, आळंदीला आल्यानंतर सर्वात पहिली ओढ ही माऊलींच्या दर्शनाची असते. ही नगरी आपल्या सर्वांकरिता एक पुण्य नगरी आहे. वारकरी संप्रदायामध्ये इंद्रायणी नदीला खूप महत्त्व आहे. तिच्या संवर्धनासाठी आपण विकास आराखडा तयार करत आहोत, हा आराखडा जेव्हा साकार होईल तेव्हा निर्मळ इंद्रायणी निश्चितपणे अनुभवायला मिळेल.
फडणवीस पुढे म्हणाले, 2017 साली आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत आळंदीवासियांनी ही नगरपालिका भाजपाच्या हाती दिली. तेव्हा आम्ही पिण्याच्या पाण्याची योजना आणली, तसेच आळंदी शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा सुधारित आराखडा देखील आम्ही तयार केला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर परिसरातील कामे गतीने सुरू आहेत. तसेच आळंदी बायपास-रिंगरोड, उत्तरेकडील रस्ता, एसटी स्टॅण्डसाठी 5 एकर जागा, पार्किंग व्यवस्था आणि भक्तनिवासाची कामे सुरू केली आहेत. संतपीठ उभारण्यासाठीचा आराखडा केंद्र सरकारकडे पाठवला असून त्यालाही लवकरच मंजूरी मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. उद्या होणाऱ्या निवडणुकीत आळंदीकरांनी आमच्या उमेदवारांना निवडून द्यावे. पुढची 5 वर्ष आम्ही आळंदीच्या जनतेच्या विकासाची काळजी घेऊ, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.