2 तारखेला कमळ चिन्हाला मत टाकण्याची काळजी तुम्ही घ्या पुढची 5 वर्षे उरुण- ईश्वरपूरवासियांची काळजी आम्ही घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही!

81

सांगली : उरुण-ईश्वरपूर नगर परिषद भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित विराट विजयी संकल्प सभा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

या सभेसाठी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब डांगे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आ. सुधीरभाऊ गाडगीळ, सुरेश खाडे, सदाभाऊ खोत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निशिकांत पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, निताताई केळकर तसेच भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ईश्वरपूरकरांचा आजचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून स्पष्ट आहे की या निवडणुकीत भाजपा महायुतीचा विजय निश्‍चित आहे. नगर परिषदेच्या विकासाची नवी वाटचाल आजच्या सभेतूनच सुरू झाली आहे, असा ठाम विश्वास वाटत असल्याचे देखील पाटील म्हणाले.

उरुण- ईश्वरपूर या नामांतरानंतर मी पहिल्यांदाच इथे आलो असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 172 वर्षांची मागणी पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही केला. हे जुने शहर आहे, जनतेच्या आशीर्वादाने या नगरपालिकेत आपली सत्ता आली. राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या शहरासाठी पहिल्यांदा भुयारी गटारांची योजना मंजूर केली आणि 49 कि.मी. गटारांचे काम पूर्ण केले. आणखी 160 कि.मी. करता लागणारा निधीही निश्चितपणे आपण देणार आहोत, असे फडणवीसांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले, पाणी पुरवठ्याची योजना देखील तयार आहे आणि त्यासाठी लागणारा जो निधी लागेल तो देखील आम्ही देणार आहोत. या योजनेमुळे जवळपास 27 MLD पाणी रोज उरुण – ईश्वरपूरला मिळणार आहे. त्यासोबतच या शहराला रिंग रोड देणे हे देखील सर्वात महत्त्वाचे आहे. येत्या काळात रिंग रोड आपण निश्चितपणे करून देऊ. आमच्याकडे भेदभाव नाही, जो व्यक्ती या भारताला आपला देश मानतो, भारताच्या कल्याणाचा विचार करतो, तिरंग्याचा मान राखतो अश्या प्रत्येक व्यक्तीचे कल्याण करणे, विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. येत्या 2 तारखेला कमळ चिन्हाला मत टाकण्याची काळजी तुम्ही घ्या पुढची 5 वर्षे उरुण- ईश्वरपूरवासियांची काळजी आम्ही घेऊ, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.