ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ… या प्रकल्पामुळे ईस्टर्न फ्री वे संपल्यावर दक्षिण मुंबईत येण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) चे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारचे अभिनंदन केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले , मुंबई म्हणजे स्वप्ननगरी. सतत धावणारं शहर. मात्र या शहराच्या वेगाला वाहतूक कोंडीमुळे ब्रेक लागतो. हे लक्षात घेऊन महायुती सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले. कोस्टल रोड, मरीन ड्राइव्हला पाण्याखालून भुयारी मार्ग… अभियांत्रिकी चमत्कार वाटावेत असे प्रकल्प महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात यशस्वी केले आहेत. यात आणखी एका गेम चेंजर प्रकल्पाची भर पडली आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगद्याचे काम आज सुरू झाले. हे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे महायुतीचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे ईस्टर्न फ्री वे संपल्यावर दक्षिण मुंबईत येण्यासाठी लागणारा वेळ खूपच कमी होईल. वाहतूक कोंडी, प्रदूषणही टळेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या कुशल मार्गदर्शनात दोनेक वर्षातच हा प्रकल्प जनतेसाठी नक्कीच खुला होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पूर्व मुक्त मार्गामुळे नागरिकांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत 20-25 मिनिटांत पोहोचता येते; मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. तसेच पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत होता. या समस्येवर तोडगा म्हणून ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना मडण्यात आली, या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शुभारंभ प्रसंगी दिली.