मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात घेतला सहभाग… “मोहरा महाराष्ट्राचा” या पुस्तकाचे केले वाचन
नागपूर : वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठी पुणेकर आतुरतेने वाट पाहत असलेला ‘पुणे पुस्तक महोत्सव–२०२५’ लवकरच सुरू होत आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने, मुख्य समन्वयक आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी “शांतता पुणेकर वाचत आहेत” हा उपक्रम शहरभर राबविला जातो. या उपक्रमाला दरवर्षी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदाही हा उपक्रम आजपासून सुरू झाला आहे. यावेळी पुणेकर विश्व विक्रम करणार, असे उत्साहवर्धक वातावरण या उपक्रमातून दिसून येत आहे. एक जागरूक पुणेकर म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशनातून या उपक्रमात सहभाग घेतला.
या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रमेश अंधारे यांनी संपादित केलेल्या “मोहरा महाराष्ट्राचा” या पुस्तकाचे वाचन केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकातून महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे आणि अस्मितेचे अनोखे दर्शन घडले. चंद्रकांत पाटील यांनी यंदा देखील शांतता पुणेकर वाचत आहेत उपक्रमात सहभाग घेऊन, या वाचन चळवळीला बळ दिले.
वाचन संस्कृतीला नवे बळ देत पुण्याला ‘पुस्तकांची राजधानी’ बनवण्याच्या उद्देशाने पुणे पुस्तक महोत्सव आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या वतीने आज ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा अनोखा उपक्रम शहरभर राबविण्यात येत आहे. या महाअभियानासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.