ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन… पीडित, शोषित आणि मजूर या वर्गांच्या हक्कांसाठी बाबा आढाव यांनी केलेला संघर्ष म्हणजे जणू एक दीपस्तंभच! – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन चटका लावणारे आहे, अशी भावना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करताना पाटील म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन चटका लावणारे आहे. पीडित, शोषित आणि मजूरांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत त्यांनी या वर्गांच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष म्हणजे जणू एक दीपस्तंभच! समाजकारणातील त्यांचे योगदानही सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!, अशा शब्दात पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता.