यंदाचा प्रतिष्ठित ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर… हा पुरस्कार त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव असून महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मूल्यांप्रमाणेच शिक्षणप्रसार आणि समाजउन्नतीसाठी देवाभाऊंनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी झालेली त्यांची निवड अत्यंत योग्य आणि सार्थ ठरते. सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, शिक्षणप्रेमी विचारसरणी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाची ही पावती आहे. हा पुरस्कार त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव असून महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. आपण यापुढेही महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशीच देदीप्यमान कामगिरी करत राहाल आणि आपल्या नेतृत्वाखाली राज्य अधिक सक्षम, समृद्ध व स्वावलंबी बनेल, हाच विश्वास आणि सदिच्छा देखील त्यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी देण्यात येणार आहे. रु.पाच लक्ष रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या दि.२७ डिसेंबर २०२५ ला आयोजित १२७ व्या जयंती उत्सवाच्या मुख्य समारंभात या पुरस्काराने मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.