वाचकांची वर्षभराची प्रतीक्षा संपवत, पुणे पुस्तक महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वाचे उद्घाटन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न

17

पुणे : पुणे येथे तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, तसेच राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात उद्घाटन झाले. या कार्यक्रमास उपस्थित राहून चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांना व पुस्तकप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या ‘लस्ट फॉर मुंबई’ या कादंबरीचे देखील प्रकाशन करण्यात आले. पुणे ही पुस्तकांची जागतिक राजधानी होण्यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेतला पाहिजे. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक पुस्तक महोत्सवात पुणेकरांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. तसेच दर्जेदार लेखक होण्यासाठी अवांतर वाचन अत्यावश्यक असून, आधुनिक काळातही पुस्तकांचे महत्त्व व आकर्षण कधीच कमी होणार नाही, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाने अवघ्या दोन वर्षांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून या महोत्सवामुळे वाचन चळवळ आणखी भक्कम होण्यास मदत होत आहे. पुणे पुस्तक महोत्सवात वाचकांची संख्या दरवर्षी वाढतच असून विक्रमी पुस्तक विक्रीही झाली आहे. हे सकारात्मक चित्र निश्चितच आशावादी आणि मराठी साहित्य क्षेत्रात नवचैतन्य आणणारे ठरत आहे. वाचनप्रेमींना पुढील आठ दिवस साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असून पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं पुणे शहर हे आगामी काळात पुस्तकांची पंढरी ठरणार आहे. भविष्यात असे महोत्सव ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तेथे ग्रंथालय, वाचनालय निर्माण करावे लागतील. पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुण्याचे नावे जगभर जावे. त्यातून मराठीसह इतर प्रादेशिक भाषांचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली.

गतवर्षीच्या तुलनेत महोत्सवाने यंदा आपला प्रचंड विस्तार केला आहे. तब्बल ८०० हून अधिक स्टॉल्स, लाखो पुस्तके, शेकडो नवोदित लेखक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदाचा महोत्सव सजला आहे. येत्या २१ तारखेपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.

या प्रसंगी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य समन्वयक राजेश पांडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, आबा रावत, बागेश्री मंठाळकर, किरण ठाकूर, प्रसेनजित फडणवीस यांच्यासह असंख्य पुस्तकप्रेमी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.