मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्व. बाबा आढाव यांच्या बिबवेवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन बाबांच्या स्मृतीस केले विनम्र अभिवादन
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक, कष्टकरी आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी अखेरपर्यंत लढणारे बाबा आढाव यांना नुकतीच देवाज्ञा झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी त्यांच्या बिबवेवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना बाबांचा स्नेह व मार्गदर्शन अनेक वेळा लाभले. समाजासाठी त्यांनी केलेले योगदान सदैव स्मरणात राहील. या दुःखद प्रसंगी आढाव कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या. वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत त्यांनी या वर्गांच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष म्हणजे जणू एक दीपस्तंभच! समाजकारणातील त्यांचे योगदानही सदैव प्रेरणादायी राहील.
बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला.