तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी; ‘युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीजगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न
पुणे : तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य समन्वयक राजेश पांडे लिखित ‘युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीजगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मंत्री माधुरीताई मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, तसेच कृष्णकुमार गोयल, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस, किरण ठाकूर यांच्यासह असंख्य वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी महोत्सवातील विविध स्टॉल्सना भेट देऊन प्रकाशक, लेखक आणि वाचकांशी मनमोकळा संवाद साधला. राजेश पांडे यांनी लिहिलेल्या ‘युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीजगाथा’ या पुस्तकात लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या १२ गिनीज विश्वविक्रमांची माहिती आहे. या उपक्रमांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी वाचन संस्कृती वाढवण्याच्या या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या जागतिक महत्त्वाकांक्षेवर भाष्य केले. पुणे शहर २०२७ सालासाठी ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (World Book Capital) होण्यासाठी नामांकन भरले आहे. पुढील वर्षीचा बुकफेस्ट हा जागतिक स्तरावर आयोजित केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
१३ डिसेंबर रोजी सुरू झालेला हा महोत्सव २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये ८०० हून अधिक स्टॉल्स, लाखो पुस्तके, बाल महोत्सव, मिलेट महोत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.