मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते पुणे महानगरपालिकेच्या ₹3000 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन व उदघाटन संपन्न

16

पुणे : पुणे महापालिका व पुणे मेट्रो कॉर्पोरेशनच्या सुमारे ₹३,००० कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यासोबतच पुणे पोलीस दलातील नव्या पोलीस स्टेशनचे ऑनलाईन उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्वपूर्ण कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री माधुरीताई मिसाळ, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डिकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, मलशुद्धीकरण केंद्र अशा सामान्य माणसांच्या आयुष्यात ‘इज ऑफ लिविंग’ आणणाऱ्या विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले. त्यासोबतच 32 रस्ते आहेत यांना विकसित करणे आणि त्यांच्या मिसिंग लिंक्स दूर करणे हे काम देखील हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या वाहतुकीशी संबंधित आव्हाने कमी होणार आहेत.

पुणे हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे, त्यामुळे पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने दळणवळणाचा एक सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे, हजारो कोटींच्या या आराखड्याद्वारे मेट्रो तयार करण्यात आली आहे आणि तिचा विस्तारही होत आहे. पुण्याच्या नागरिकांनी पुणे मेट्रोला प्रचंड चांगला प्रतिसाद दिला. मेट्रोसोबत इलेक्ट्रिक बसेसदेखील पुण्यात आणल्या जाणार आहेत. त्यासोबतच पुण्याला इतर शहरांशी जोडणाऱ्या रस्त्यांबाबत आवश्यक उपाययोजना करून पुण्याला सुलभ वाहतूक जोडणी देता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुणे हे औद्योगिक केंद्र बनत असल्याने ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC)’ मध्ये महाराष्ट्राची कॅपिटल पुणे आणि नवी मुंबई बनेल आणि त्यातून हजारो रोजगार निर्माण होतील. नवी मुंबई ते पुणे मध्ये देशाचे डेटा सेंटर कॅपिटल होत आहे. त्यामुळे इथे तयार होणारी डेटा-सेंट्रिक अर्थव्यवस्था एआय ने चालणार असून येत्या काळात ती 2-3 पटीने वाढणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होत असलेली पाण्याची समस्या लक्षात घेता, येत्या काळात टाटा समूहाच्या धरणांमधून पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विकासकामांसोबतच शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे त्यासाठी सरकार आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीने काम करणं गरजेचं असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं.

पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळणार असून, त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर रस्ते विकास व शहर सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत. तसंच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस खात्याला सरकारचे नेहमीच पूर्ण सहकार्य राहिले आहे आणि पुढेही राहील. पुणे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व सुसह्य जीवन मिळावे यासाठी पोलीस दलाने अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना या निमित्ताने अजित पवार यांनी पोलीस दलास दिल्या. येत्या काळात पुणे मेट्रोचा विस्तार सुमारे २०० किमीपर्यंत करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. शहरातील नागरिकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे सरकार नेहमीच तत्पर राहील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.