इचलकरंजी शहरात अंदाजित ४३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न

12

कोल्हापूर : वस्त्रनगरी इचलकरंजी येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या भव्य पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरुवर्य संभाजी भिडे (गुरुजी) यांच्या शुभहस्ते पार पडले. या ऐतिहासिक प्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजनही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशिल माने, आमदार डॉ. राहूल आवाडे, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहराचा सुरळीत पाणीपुरवठा तसेच महानगरपालिकेच्या कोट्यवधीचा जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. इचलकरंजी शहरात अंदाजित ४३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

सुमारे ४३० कोटी रुपये खर्च करून इचलकरंजी शहरातील महानगरपालिका क्षेत्रात १० तर ५ ग्रामीण भागात विकासकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पंचगंगा प्रदूषण उपाययोजनेअंतर्गत औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी (मनपा व एमआयडीसी क्षेत्र) ३६१.३१ कोटी, ग्रामीण भागात (जिल्हा परिषद) ५.७५ कोटी, तर शहरात ६२.७७ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कळ दाबून (रिमोटद्वारे) केले.

जीएसटी परतावा मिळणार

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पुढील पाच वर्षांत जीएसटीच्या परताव्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच जीएसटीचा आवश्यक तो परतावा इचलकरंजीकरांना मिळेल. शहराच्या विकासाकरिता आणि येथील उद्योगांसाठी योग्य ती कार्यवाही करून इचलकरंजी शहराचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘श्री शंभूतीर्थ’ पुतळ्याचे लोकार्पण

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कॉ. के. एल. मलाबादे चौक सुशोभीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ‘श्री शंभूतीर्थ’ म्हणून लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

पुतळ्याच्या अनावरणावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महानगरपालिकेसह येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून हा पुतळा उभारला आहे. यातील जनसहभाग महत्त्वाचा असून, हे एका अर्थाने जनतेचे स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने लोकांमध्ये तेज निर्माण होते. महाराजांचा इतिहास देदिप्यमान असून, तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या सोहळ्यासाठी संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी इचलकरंजी येथील हेलिपॅडवर आमदार डॉ. राहूल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.