कोंढवा बुद्रूक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न

13

पुणे : कोंढवा बुद्रूक येथे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे, मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता, स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला असे नमूद करून फडणवीस म्हणाले, ते एक दृष्टे नेते, राज्यकर्ते होते त्यांनी समतेचे राज्य निर्माण केले. स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना कठोरातले कठोर शिक्षा करणारे त्यांचे शासन होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोंढव्याची भूमी आहे, या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होत असल्याचा आनंद होत आहे. पुतळ्यामुळे कोंढवा बु. परिसरासह संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव वाढले आहे.

ज्या काळात मोगलशाही, नीजामशाही, आदिलशाही असे परकीय आक्रमक मराठीभूमी, हिंदुस्थानावर आक्रमण करीत होते, त्यावेळी अनेक राजे आणि राजवाडे मुघलांचे मंडलिक म्हणून आधिपत्य स्वीकारत होते. अशा काळामध्ये जिजाऊ मासाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. अठरापगड जातीच्या नागरिकांना एकत्र करून, त्यांच्यामध्ये विजिगीषुवृत्तीचे रोपण करुन त्यांच्यामाध्यमातून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी लढाई करुन स्वराज्याचे रक्षण केले. त्यानंतर ताराराणींनी झुंज कायम ठेवत मराठ्यांनी दिल्लीचे तख्तही काबीज केले. अटकेपार झेंडाही मराठ्यांनीच लावला. आम्हाला स्वाभिमान देणारे, महाराष्ट्राचा अभिमान असणारे शिवाजी महाराजांचा सिबीएससीच्या अभ्यासक्रमात २१ पानांचा जाज्वल इतिहासाचा समावेश केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

टिळेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण झाले. राज्य शासनाच्या माध्यमातून कोंढवा परिसराचा पायाभूत विकास करण्यात येत आहे, असेही टिळक म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.