सांगलीत भाजपचे ‘मिशन महापालिका’ सुरू! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक संपन्न… निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा
सांगली : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली भाजपाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक तयारी, रणनीती आणि पुढील कार्ययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री आ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ, आ. अतुलबाबा भोसले, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दीनकरतात्या पाटील, नितीन शिंदे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, निताताई केळकर, पृथ्वीराज पवार, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, सुरेश आवटी, दिलीप सूर्यवंशी, धीरज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. प्रत्येक प्रभागातील ताकद, जनसंपर्क आणि विकासकामांची पोहोच यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सांगलीचा सर्वांगीण विकास हाच भाजपचा अजेंडा असून, कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागावे, असे निर्देश पाटील यांनी दिले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे सांगली भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता राखण्यासाठी सर्व नेत्यांनी एकदिलाने काम करण्याचा संकल्प यावेळी केला. या बैठकीमुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून, भाजपने विजयासाठी कंबर कसली आहे.