पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती सज्ज! भाजपा-शिवसेना युतीवर एकमत… लवकरच जागावाटपसंदर्भात अंतिम निर्णय घेणार

13

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची महत्त्वपूर्ण संयुक्त समन्वय बैठक पुण्यात संपन्न झाली. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका मतदानासाठी महायुतीने आता कंबर कसली असून, या बैठकीत जागावाटप आणि निवडणूक प्रचाराच्या रणनीतीबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. महायुती म्हणून एकदिलाने लढून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, मंत्री माधुरीताई मिसाळ, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिका प्रभारी गणेश बिडकर, शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीनंतर मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली,युतीच्या संदर्भात यावेळी प्रार्थमिक चर्चा करण्यात आली. युती म्हणून लढताना राज्यातील नेत्यांचे एकमत झाले आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर आहे परंतु सर्वांनाच संधी देता येत नाही. भाजपमधून बंडखोरी होण्याची शक्यता कमी असेल, असे मत यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. तसेच मोहोळ म्हणाले यात निवडणूक एकत्रित लढण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सदर चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच जागावाटपसंदर्भातही अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.