पुण्यात घुमला ‘मराठी बाणा’! हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या उपक्रमाचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शानदार शुभारंभ
पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या आणि मराठी संस्कृतीचा वारसा जतन करणाऱ्या हिंदू गर्जना प्रतिष्ठान आयोजित ‘मराठी बाणा’ या विशेष कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील यांनी मराठी अस्मिता आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
हिंदू प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज घाटे आणि माजी नगरसेविका मनीषा धनंजय घाटे यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हेमंत रासने, भाजपा नेते श्रीनाथ भिमाले, अजय खेडेकर, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुभारंभप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठी भाषा आणि आपली संस्कृती ही आपली खरी ओळख आहे. हिंदू गर्जना प्रतिष्ठानने ‘मराठी बाणा’ या उपक्रमाच्या माध्यमातून ही अस्मिता जपण्याचे जे कार्य हाती घेतले आहे, ते कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांनी उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
या कार्यक्रमात मराठी भाषेतील वैभव, पारंपरिक कलाप्रकार आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक उपस्थित होते.