पुण्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश… भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पुण्यातील काही प्रमुख माजी नगरसेवक तसेच तरुण नेतृत्वाने शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश प्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्वात सुरु असलेल्या विकासपर्वात नव्याने सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून स्वागत यावेळी करण्यात आले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्यासह शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी नगरसेवक सचिन दोडके, बाळासाहेब धनकवडे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर उबाठा गटाचे नेते संजोग वाघेरे पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे, राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, उबाठा गटाचे माजी नगरसेवक अमित गावडे, उबाठा गटाच्या माजी नगरसेविका मीनल यादव, शिवसेना शहर संघटक सचिन सानप, शिवसेना भोसरी विधानसभा संघटक दादा नरळे, काँग्रेस चे माजी नगरसेवक सद्गुरू कदम, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक समीर मासुळकर, राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक विकासनाना दांगट, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, काँग्रेस नेते व माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र कणव चव्हाण, हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या सौ. वैशाली तुपे, विराजदादा तुपे, खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी होले (शिवरकर), राजेंद्र लोखंडे, बाबा शिवरकर, विद्यानंद बोंद्रे, इंदिरा तुपे, मुळशी तालुक्यातील उबाठा गटाचे कार्यकर्ते व पंचायत समिती माजी सभापती भानुदास पानसरे, उपतालुका प्रमुख गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) तालुका अध्यक्ष आनंद माझिरे, उपाध्यक्ष संतोष पानसरे, सरचिटणीस सुहास पानसरे, उपाध्यक्ष किरण मराठे आदींनीही या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने होणारी वेगवान वाटचाल बघून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपावर विश्वास ठेवून हे सर्वजण पक्षात आले आहेत. या सर्वांना उचित न्याय आणि सन्मान दिला जाईल.
यावेळी केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले की, पुण्यातील समाजकार्यामुळे जनमानसात वेगळे स्थान असलेल्या मंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाच्या विचारधारेला पाठिंबा देत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पुण्यात भाजपाचे हात मजबूत झाले आहेत.