स्व. मुक्ताताई टिळक यांचे पुण्याच्या विकासातील योगदान अतुलनीय; स्मृतीदिनानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली आदरांजली
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार स्व. मुक्ताताई टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून त्यांच्या पावन स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले. पुण्यातील टिळक वाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात मुक्ताताईंच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताताईंच्या कुटुंबीयांशी आणि त्यांच्या मित्रपरिवाराशी संवाद साधला. या संवादातून मुक्ताताईंच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील अनेक प्रेरणादायी आठवणींना आणि त्यांच्या कामाच्या शिस्तीला उजाळा मिळाला. पक्षासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या, लोकहितासाठी सदैव तत्पर असलेल्या मुक्ताताई टिळक यांचे पुण्याच्या सर्वांगीण विकासातील योगदान अतुलनीय असून ते कायम स्मरणात राहील, अशी भावना याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि टिळक प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.