पुणे पुस्तक महोत्सवाचा अभूतपूर्व समारोप! २५ लाख पुस्तकांची विक्री अन् १०७ नव्या ग्रंथांचे प्रकाशन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
पुणे : तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात समारोप होत आहे. त्यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज महोत्सव स्थळास भेट देऊन संपूर्ण आयोजनाचा आढावा घेतला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदाच्या महोत्सवात जवळपास २५ लाख पुस्तकांची विक्री झाली असून, विविध लेखकांची १०७ नवी पुस्तके प्रकाशित झाल्याचे जाणून अत्यंत आनंद झाला. गेल्या तीन वर्षांत पुणेकरांनी या पुस्तक महोत्सवाला दिलेला उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी असल्याचे पाटील म्हणाले. पुणे शहराला ‘पुस्तकांची राजधानी’ बनवण्याचा जो संकल्प पुणेकरांनी केला आहे, त्याच्या पायाभरणीचे कार्य या महोत्सवाच्या माध्यमातून प्रभावीपणे सुरू झाले आहे, असे यावेळी प्रकर्षाने जाणवले.
या भेटीदरम्यान डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘अभिनव उद्योजकांची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे, प्रसाद ओक, आणि प्रवीण तरडे यांनी उपस्थित राहून महोत्सवाचा उत्साह द्विगुणित केला. याप्रसंगी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, ज्येष्ठ प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो वाचक उपस्थित होते.