पुण्यात महायुतीची वज्रमुठ! रामदास आठवलेंच्या उपस्थितीत रंगला आरपीआयचा संकल्प मेळावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा संकल्प मेळावा केंद्रीय मंत्री व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. या भव्य मेळाव्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, भाजपाने नेहमीच आंबेडकरी चळवळीचा सन्मान केला असून, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायमच रामदासभाईंना योग्य मान-सन्मान दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या २८८ नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेला प्रचंड जनादेश हा जनतेच्या विश्वासाचा ठोस पुरावा आहे.

पुणेकरांना भाजपा–शिवसेना–रिपाइं महायुती हवी असून, आगामी निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करून पुणे महापालिकेवर भाजपा–शिवसेना–रिपाइंचा झेंडा फडकवूया, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नगरपरिषद निवडणुकांचे निकाल आणि आगामी युवक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची पुढील दिशा ठरवणारा हा मेळावा ठरला. युवकांना संघटित करून सत्तेत सहभागी होण्याचा आणि विकासाच्या राजकारणाला बळ देण्याचा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर, रिपाइं प्रदेश सचिव परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रभारी शैलेश चव्हाण, माजी नगरसेविका हिमालीताई कांबळे, माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासह रिपाइंचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.