पुणे महापालिकेचा शंखनाद : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या ‘विकास रथा’चे जल्लोषात उद्घाटन
पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून, रविवारी शहरात भाजपच्या प्रचारार्थ ‘विकास रथा’चे भव्य उद्घाटन करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
पुणे शहरात गेल्या पाच वर्षांत झालेली विकासकामे आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या रथाची निर्मिती करण्यात आली आहे. पुण्याच्या प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी आणि विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असा संदेश या रथाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवला जाणार आहे.

प्रचार रथांवर एलईडी स्क्रीन असून दृकश्राव्य माध्यमातून पक्षाने केलेल्या कामांची माहिती दिली जाणार आहे. हे प्रचार रथ शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरुन भाजपाने पुण्यासाठी केलेल्या कामांची माहिती आणि भावी विकासाची दिशा याबाबत प्रचार आणि प्रसार करणार आहेत. ‘पुण्याचा विकास करायचा तर ‘भाजपा’च पाहिजे’ असं घोषवाक्य या प्रचार रथांवर आहे.
या कार्यक्रमाला पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थिती होते.यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
हा विकास रथ प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांशी संवाद साधणार असून, महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने या विकास रथाच्या माध्यमातून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.