पुणे महानगरपालिका निवडणूक : भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक संपन्न; राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजींचे संघटनात्मक मार्गदर्शन
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती अधिक आक्रमक केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, बूथ स्तरावर कार्यपद्धती राबवणे आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढवणे यावर शिवप्रकाशजींनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, मंत्री माधुरीताई मिसाळ, गणेश बिडकर यांच्यासह पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत शिवप्रकाशजी यांनी निवडणुकीच्या नियोजनाबाबत विविध विषयांवर भाष्य केले. या बैठकीमुळे भाजपच्या स्थानिक फळीला नवी उभारी मिळाली असून, पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीसाठी पक्षाची यंत्रणा आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.