भांडुप (पश्चिम) येथे झालेला भीषण बस अपघात अत्यंत दुर्दैवी व मन हेलावून टाकणारा… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

17

मुंबई : भांडुप (पश्चिम) येथील स्टेशन रोड परिसरात काल रात्री एका ‘बेस्ट’ (BEST) बसचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत बसने पादचाऱ्यांना धडक दिल्याने चार निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या मन हेलावून टाकणाऱ्या दुर्घटनेची दखल घेत राज्य सरकारने तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. “भांडुपमधील ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अपघातात जीव गमावलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, या घटनेत जे नागरिक गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

स्टेशन रोडवरील गजबजलेल्या परिसरात ही बस प्रवाशांच्या अंगावर गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अपघाताचे नेमके कारण काय होते आणि बसवर चालकाचे नियंत्रण सुटले होते का, याचा सविस्तर तपास पोलीस आणि बेस्ट प्रशासनाकडून केला जात आहे. जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.