भारतीय रेल्वेचा नवा सुवर्णअध्याय! ‘वंदे भारत स्लीपर’ची यशस्वी चाचणी; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

41

पुणे : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात आज एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. बहुप्रतिक्षित ‘वंदे भारत स्लीपर’ एक्सप्रेसची यशस्वी चाचणी पश्चिम-मध्य रेल्वेच्या राजस्थानमधील कोटा – नागदा सेक्शनमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या ऐतिहासिक यशाबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले आहेत.

कोटा ते नागदा दरम्यान झालेल्या या चाचणीत वंदे भारत स्लीपर ट्रेनने तांत्रिक निकषांवर उत्तम कामगिरी नोंदवली आहे. आधुनिक सुविधा, जास्तीत जास्त वेग आणि प्रवाशांची सुरक्षा या त्रिसूत्रीवर आधारित ही ट्रेन आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. या चाचणीच्या यशाने भारतीय रेल्वेच्या इतिहासात नव्या सुवर्णअक्षरांचा अध्याय लिहिला गेला आहे.

या उपक्रमाचे कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ‘विकसित भारताच्या’ दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे दूर पल्ल्याचा प्रवास केवळ गतीमानच नव्हे, तर अत्यंत आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. रेल्वे क्षेत्रातील हे परिवर्तन ऐतिहासिक आहे.

प्रवासाचा नवा अनुभव देणाऱ्या या क्रांतिकारी बदलामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.