भारताची ऐतिहासिक आर्थिक भरारी! जपानला मागे टाकत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला सार्थ अभिमान
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आणि खंबीर नेतृत्वाखाली भारताने आज जागतिक अर्थव्यवस्थेत एक नवा इतिहास रचला आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (4th Largest Economy) होण्याचा बहुमान मिळवला आहे. भारताचा जीडीपी (GDP) आता ४.१८ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला असून, या यशाबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी या ऐतिहासिक यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुयोग्य आर्थिक धोरणांना दिले आहे. ते म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार भारताच्या प्रगतीचे नवनवीन अध्याय लिहित आहे. ही भरारी इतकी दमदार आहे की, येत्या काही वर्षांतच भारत जर्मनीलाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
या यशाबद्दल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विशेषतः, भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.
भारताने जागतिक स्तरावर मिळवलेले हे स्थान प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राद्वारे भारत आता आर्थिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या यशानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण असून, २०२५ वर्षाची सांगता भारतासाठी अत्यंत भूषणावह ठरली आहे.