सांगलीत महायुतीच्या प्रचाराचा धडाका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विजयाचा विश्वास

44

सांगली  : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा, जनसुराज्य, आरपीआय युतीचा भव्य शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रचार सभेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विकास, सुशासन आणि जनहिताच्या मुद्द्यांवर आधारित निवडणूक लढवून भाजपा, जनसुराज्य, आरपीआय युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

या प्रसंगी माजी मंत्री आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह भाजपा, जनसुराज्य, आरपीआय युतीचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सांगलीतून महापालिका प्रचाराचा शुभारंभ केला. मागील काळात सांगलीकरांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेची जबाबदारी भाजपाकडे आली आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, असे यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले. सांगली-कोल्हापूर महापुरावर कायमस्वरूपी उपाय म्हणून वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने सुमारे ₹4000 कोटींचा ‘फ्लड डायव्हर्जन’ प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याचा पहिला टप्पा कार्यान्वित होत आहे. यासोबतच मागील काळात सांगलीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी, घनकचरा व्यवस्थापनासाठी, शाहू विकासमार्गासाठी, काळी खण विद्युत रोषणाईसाठी तसेच मलनिस्सारण प्रकल्पासारख्या विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधीचा निधी देण्यात आला.

फडणवीस पुढे म्हणाले, भाजपाचा झेंडा पुन्हा महानगरपालिकेवर फडकल्यानंतर सर्वप्रथम नवीन महापालिका भवनासह आधुनिक, स्वच्छ आणि भविष्यासाठी सज्ज सांगली उभारण्याचा आमचा संकल्प आहे. सांगलीवासीयांना यानिमित्त आवाहन आहे की, येत्या 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, पुढील 5 वर्ष तुमची काळजी आमच्यावर सोडा.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, देवेंद्रजींचे महाराष्ट्रातील काम आणि सांगलीकडे लक्ष आहे म्हणूनच जनतेला विश्वास आहे. सगळे पक्ष भाजप विरोधात एकत्र आले तरी काही उपयोग होणार नाही. देवेंद्रजींचं महाराष्ट्रातील काम, सांगलीकडे असणार लक्ष, यावर सर्वसामान्य माणसांचा विश्वास आहे. अतिशय चांगले, मेहनतीने काम करणारे कार्यकर्ते हे उमेदवार म्हणून दिले आहेत. त्यामुळे कामावर आपण लढूया असे पाटील यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.