इचलकरंजीत महायुतीचा विजयी संकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य रॅली आणि सभा उत्साहात संपन्न

47

कोल्हापूर : इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा–शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य प्रचार रॅली व जाहीर सभा संपन्न झाली. या ऐतिहासिक रॅलीला व सभेला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीला इचलकरंजीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हळवणकर तसेच भाजपा–शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ‘विजयी संकल्प रॅली’मध्ये उसळलेला इचलकरंजीकरांचा प्रचंड जनसागर महायुतीच्या होऊ घातलेल्या विजयाची ग्वाही देत होता. या उत्साह आणि प्रेमाची परतफेड ‘आधुनिक इचलकरंजी’च्या निर्मितीतूनच होऊ शकते, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी इचलकरंजीकरांचा आशीर्वाद मागितला. इचलकरंजी येथे महानगरपालिकेसाठी होत असलेली ही पहिलीच निवडणूक असून महायुती सरकारने इचलकरंजी शहरात सातत्याने विविध विकासकामे केली आहेत. मलनिस्सारण प्रकल्पासारखा मॉडेल प्रकल्प येथे राबवण्यात येत असून, त्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान देण्यात आले आहे. यासोबतच बस डेपो, सिमेंट रस्ते, ना. बा. घोरपडे सभागृह, रवींद्रनाथ टागोर वाचनालय, तलावांचे पुनरुज्जीवन अशी अनेक विकासकामे शासन व महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहेत. इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवण्याचे काम महायुती सरकार प्राधान्याने करत आहे. पुढील काळातही अनेक महत्त्वाची विकासकामे प्रस्तावित आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

फडणवीस पुढे म्हणाले, ही निवडणूक आमच्यासाठी विकासाची निवडणूक आहे. इचलकरंजीकरांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. महायुती इचलकरंजीकरांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, इचलकरंजीवासीयांनीही महायुतीला आपला आशीर्वाद द्यावा!इचलकरंजीवासीयांनी येत्या 15 तारखेला महायुतीची काळजी घ्यावी, पुढील 5 वर्षे इचलकरंजीवासीयांची काळजी महायुती घेईल, असे फडणवीस म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.