कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भव्य सभा संपन्न

47

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा–शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या प्रचार सभेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपा–शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आई आंबाबाईच्या कृपेने आणि कोल्हापूरकरांनी दिलेल्या अपार प्रेम व विश्वासाच्या बळावर यावेळी कोल्हापूर महापालिकेवर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचा झेंडा नक्कीच फडकेल, असा ठाम विश्वास असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले, आदरणीय मोदीजी व आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात मुलभूत आणि पायाभूत सोई-सुविधा उभारणीचं काम गतिमान पद्धतीने होत आहे. कोल्हापूर शहरात देखील गतिमान पद्धतीने सोई-सुविधा उभारण्यासाठी भाजपा-महायुतीचा महापौर असणे गरजेचे आहे, हा संदेश प्रत्येक कोल्हापूरकरापर्यंत पोहोचवा, असे कार्यकर्त्यांना आवाहन देखील त्यांनी केले.

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झालेली ही महायुती ऐतिहासिक महायुती आहे. कोल्हापूर शहराच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा घेऊन ही निवडणूक महायुती लढवत आहे. 20 प्रभागांमधून 81 उमेदवार सुशिक्षित, सक्षम, युवा वर्गातील उमेदवार दिले आहेत. या सर्व उमेदवारांना येत्या 15 जानेवारी रोजी मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित नागरिकांना करण्यात आले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.