पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची भव्य जाहीर सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात संपन्न

19

पुणे : आज पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची भव्य जाहीर सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. या सभेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील यांनी विकसित पुण्यासाठी भाजपाला भक्कम पाठबळ देण्याचे नागरिकांना आवाहन केले.

या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्रिमंडळातील सहकारी पंकजाताई मुंडे, माधुरीताई मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, योगेश टिळेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, पुणे देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे. पुणे हे तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र आणि जीसीसी चे हब बनत चालले आहे. यादृष्टीने पुण्याला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी शहरात 110 किमी मेट्रोचे नेटवर्क तयार करत आहोत, जेणेकरून दळणवळण सुखकर होईल. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी पुण्यात जवळपास 12 सीवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू केले आहेत. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुळा–मुठा नदीचा किनारा विकसित करत आहोत. यामुळे नदीच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच, पुण्याच्या सर्व भागांमध्ये समान पाणीपुरवठा केला जाणार आहे आणि पाण्याची होणारी गळती कमी करण्याचाही प्रयत्न करणार आहोत. पुण्याला व्हायब्रंट शहर बनवण्यासाठी आम्ही ‘डेफिनेट व्हिजन’ तयार केले आहे. पायाभूत सुविधांसाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार केला आहे. यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक करणार आहोत. विकसित पुण्यासाठी ‘पुणे ग्रोथ हब’ तयार करत आहोत. तसेच पुण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुण्यात जवळपास 54 किमीचे भूयारी मार्ग तयार करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले, पुणे शहरासाठी इनर आणि आऊटर रिंग रोडचे काम हाती घेतले आहे, ज्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल. पुणे–अहिल्यानगर, पुणे–सोलापूर, पुणे–नाशिक या सर्व रस्त्यांवर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या माध्यमातून डबल डेकर पूल तयार करणार आहोत. ‘इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’च्या माध्यमातून थ्री-डी ट्विनिंगचे पहिले मॉडेल पुण्यात तयार करत आहोत, जेणेकरून कोणालाही कोणत्याही भागात नव्याने अतिक्रमण करता येणार नाही. शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क तयार करत आहोत, जेणेकरून पुण्याच्या सुरक्षेत भर पडेल आणि वाहतुकीचे व्यवस्थापनही करता येईल. तसेच आरोग्य, पूर नियंत्रण, कचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या काळात आम्ही पुण्याचा चेहरा बदलून दाखवू. 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास यावेळी फडणवीसांनी पुणेकरांना दिला.

यावेळी पाटील यांनी फडणवीस सरकारमधील कामांचा उल्लेख करत विरोधकांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१७ सुरु झाली. २००१ साली केवळ कागदोपत्री संमती मिळालेली मेट्रो २०१७ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरु झाली. फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो सुरु झाली, मेट्रोचे सगळे टप्पे पूर्ण झाले. जवळजवळ सव्वा दोन लाख लोक मेट्रोने प्रवास करत आहेत. मेट्रोचे सगळे टप्पे पूर्ण सुरु झल्यावर ८ लाख लोक मेट्रोने प्रवास करतील, असे पाटील यावेळी म्हणाले. विरोधकांवर टीका करताना पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणूस तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, कि तुम्ही काय केलं? इतके वर्ष पालकमंत्री होता, राज्याच्या वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होता मग तुम्ही काय केलं ? असा सवाल जनता आता तुम्हा विचारणार आहे असा हल्लाबोल पाटील यांनी केला. शेवटी पाटील यांनी सर्व नागरिकांना आवाहन केलं कि येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयला बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.