काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन… त्यांच्या जाण्याने पुण्याच्या राजकीय तसेच सार्वजनिक वर्तुळातील एक अनुभवी नेतृत्व हरपले – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक वर्षं पुण्यातून खासदार म्हणून निवडून येणारे सुरेश कलमाडी यांचं प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झालं. पुण्यातील कलमाडी हाऊस या निवासस्थानी त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कलमाडी हाऊस या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने पुण्याच्या राजकीय तसेच सार्वजनिक वर्तुळातील एक अनुभवी नेतृत्व हरपले आहे, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त करताना म्हटले, खासदार म्हणून काम पाहतानाच सुरेश कलमाडी यांनी विविध राजकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. त्यांचं खेळांवरील प्रेम सर्वश्रुतच होतं. काही काळ त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं. भाजपा पुणे शहराच्या वतीने शहर कार्यालयातील एका सभेत सुरेश कलमाडी यांना आमच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आदीही उपस्थित होते. सुरेशजींच्या जाण्याच्या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला बळ देवो, हीच प्रार्थना, असे पाटील म्हणाले.
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. 1995 ते 2007 या काळात काँग्रेसमध्ये आणि पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांचे स्थान महत्वपूर्ण असे होते. प्रथम ते भारतीय हवाई दलात ते 1965 मध्ये पायलट म्हणून सहभागी झाले होते. 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. सुरेश कलमाडी यांनी एनडीएमध्ये हवाई दल प्रशिक्षण पथकाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले. नंतर ते हवाई दलातून निवृत्त झाले. त्यानंतर मात्र कलमाडी यांनी राजकारणात प्रवेश केला. 1970 च्या दशकात कलमाडी यांची पुणे युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. कलमाडींनी पुणे चित्रपट महोत्सव आणि पुणे मॅरेथॉन सुरू केलं. त्यामुळं शहराची प्रतिष्ठा उंचावली. त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं नेतृत्व केलं होत.