केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन संपन्न
पुणे : पुणे शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या प्रसंगी मंत्रिमंडळातील मंत्री माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, रविंद्र साळेगावकर, पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मागील पाच वर्षांत पुणे शहरात झालेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला, तसेच आगामी पंचवार्षिक काळात पुण्याला अधिक सक्षम, आधुनिक व नागरिकाभिमुख शहर बनवण्यासाठीचे दूरदृष्टीपूर्ण विकास व्हिजन सादर करण्यात आले.

यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम साथीने पुणे शहराचा कायापालट सुरू असून या विकासकामांच्या या पर्वाला येत्या पाच वर्षात आणखी गती मिळणार आहे. ‘नॉन कॅपिटल सिटी’ अर्थात राजधानीचं शहर नसूनदेखील देशाच्या अर्थकारणात पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे आणि पुणे हे महाराष्ट्राचे ! म्हणूनच पंतप्रधान मोदीजी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारताचे आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी पुणे मोठे योगदान देणार आहे. ‘नॉन कॅपिटल सिटी’ असून देखील देशातील प्रख्यात राजधान्यांशी स्पर्धा करणारे पुण्यासारखे दुसरे शहर देशात नाही. म्हणूनच भारतात सर्वोत्तम पहिल्या क्रमांकाची ‘नॉन कॅपिटल सिटी’ म्हणून पुण्याला घडवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.
महापालिका हद्दीनजीकच्या गावांच्या नियोजित समावेशानंतर क्षेत्रफळानुसार पुणे महापालिका ही राज्यात क्रमांक एकची महापालिका झाली. पुणे आणि लगतचा भाग हा राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा परिसर बनला आहे. सुमारे १ कोटी ३० लाख लोकसंख्येचा देशातील सर्वाधिक वेगाने नागरिकरण होणारा परिसर म्हणून पुणे आणि परिसराचा विशेष उल्लेख आहे. साहजिकच पुणे महापालिकेचा विकास या परिसराच्या विकासाशी निगडित ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये पुण्याचं अर्थकारण व रोजगार निर्मितीला चालना देणे, वाहतूक कोंडीमुक्त जलद व सुरक्षित महामार्गांची निर्मिती आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास या त्रिसूत्रीवर भाजपाचा भर असणार आहे. या अनुषंगाने येत्या पाच वर्षांत १२ कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याचा संकल्प भाजपाचा आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.
या संकल्पपत्रात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण तसेच डिजिटल व आधुनिक नागरी सुविधा या सर्व बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. सर्वसामान्य पुणेकरांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण करण्याचा संकल्प या जाहीरनाम्यातून स्पष्टपणे मांडण्यात आला असून, विकसित पुण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.