ग्रंथालय चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ देण्यात येईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : मंत्रालयात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेची पहिली बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते. राज्य शासनाच्या निर्णयानुसार सुमारे १६–१७ वर्षांनंतर राज्य ग्रंथालय परिषद पुन्हा गठीत करण्यात आली असून, नव्याने गठीत परिषदेची ही पहिलीच बैठक होती.
या बैठकीत ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, तसेच ग्रंथालय चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ देण्यात येईल, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लिप्ते, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग उपसचिव तुषार महाजन, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अमोल मुत्याल, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, ग्रंथालय संघ अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, ग्रंथालय संघ मराठवाडा विभागाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, पुणे विभागाचे अध्यक्ष सोपान पवार, कोकण विभागाचे अध्यक्ष दिलीप कोरे,डॉ सिद्धी जगदाळे, डॉ सुभाष चव्हाण, सुनील वायाळ व संबंधित अधिकारी उपस्थित होते.