पुणे मेट्रो आणि रिक्षा प्रवासासाठी नवे अॅप; कोथरूडमधील मोफत बससेवेनंतर भाजपचा नवा पुढाकार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
पुणे : भाजपतर्फे शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारच्या अनेक धोरणांची माहिती पाटील यांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, अजित पवार यांनी सर्व नागरिकांसाठी पीएमपी आणि मेट्रो प्रवास मोफत देणार अशी घोषणा केली. परंतु, पैसे नाहीत म्हणून मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाची फाईल सहा महिने अडकवून ठेवणारे अजित पवार पुणेकरांना पीएमपी, मेट्रोतून मोफत प्रवास कसा देणार ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. पाटील पुढे म्हणाले, हा निर्णय घ्यायचा असेल तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आणावा लागेल आणि त्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाटील पुढे म्हणाले, या निवडणुकीत आपण विजयी होणारच नाही, हे त्यांना माहित असल्याने पवार यांनी हि घोषणा केली आहे, असा टोला पाटील यांनी लगावला. हि योजना कशी राबणार? असा प्रश्न त्यांना विचारल्यावर घड्याळाचे बटन दाबले कि मोफत तिकीट मिळेल असे ते सांगत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन कोथरूडमध्ये गेल्या सहा महिन्यापासून मेट्रो स्टेशनच्या परिसरात मोफत बससेवा सुरु केली आहे. अशाच पद्धतीने कमी दरात रिक्षाची सेवाही उपलब्ध केली जाणार आहे , अशी माहिती पाटील यांनी या पत्रकार परिषदेत दिली. मेट्रो एक अँप लॉन्च करत आहे ज्यात २० रुपयांमध्ये तुम्ही रिक्षाने घरी जाणार. तसेच पीएमपीएल ज्या सवलती महिलांना देत आहे त्याच मेट्रोमध्ये सुद्धा मिळणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
भाजपच्या सर्वेक्षणानुसार ११५ जागा निवडून येत आहेत. त्यात आणखी १० जागा वाढू शकतील. अजित पवार यांना सोबत न घेता भाजपचा महापौर होऊ शकतो. पण नेत्यांनी सांगितले तर अजित पवार यांना सोबत घ्यावे लागेल. नेत्यांचा निर्णय महत्वाचा असतो. त्यांना खूप दूरच दिसत असतं .या गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.