पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ११ चे उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, मनीषा बुटाला आणि शर्मिला शिंदे यांच्या प्रचारार्थ कोथरुड येथील पौड फाटा देवी मंदिर, केळेवाडी व हनुमाननगर परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पौड फाटा येथील दुर्गामाता मंदिरातून रॅलीचा प्रारंभ होऊन दुर्गामाता मंदिर, केळेवाडी, हनुमाननगर, मोरे विद्यालय, रामबाग कॉलनी, शिवतीर्थ नगर, जयभवानी नगर, म्हातोबादरा आणि सुतारदरा या मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली. या रॅलीत महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, जो कोथरुडकरांच्या विश्वासाचे प्रतीक आहे.
चनद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, कोथरुडकरांनी मला दोनवेळा निवडून देत आपला विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या सहा वर्षांत नागरिकांच्या गरजा ओळखून विविध विकासकामे आणि लोकोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवले. मानसी व सुखदा सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गरीब व गरजू कुटुंबातील माझ्या लेकींसाठी काम करण्याची संधी मिळाली. हे उपक्रम सातत्याने सुरू आहेत आणि पुढेही सुरूच राहतील, अशी ठाम ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
विकासाची ही गती कायम राखण्यासाठी, जसा विधानसभा निवडणुकीत विश्वास दाखवला, तसाच पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका निवडणुकीत दाखवुन प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे पाटील यांनी आवाहन केले.