मिरज-कुपवाडच्या प्रगतीसाठी भाजपला मतदान करा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारांना जाहीर आवाहन
मिरज–कुपवाड : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरज आणि कुपवाड शहरात प्रचाराचा धडाका लावला आहे. आज विविध भागांत पार पडलेल्या चौक सभा, पदयात्रा आणि प्रथितयश नागरिकांच्या गाठीभेटींतून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.
याप्रसंगी माजी मंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री तथा महानगरपालिका निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे–म्हैसाळकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील यांनी आगामी पाच वर्षांत मिरज आणि कुपवाडमधील नागरी समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला. शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रत्येक मत मौल्यवान आहे, त्यामुळे विकासाच्या बाजूने मतदान करा,” असे आवाहन करत चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र केली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.