विकास, पारदर्शकता आणि प्रगतीसाठी… आपले मत, महायुतीला! – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे, कोल्हापूर आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांसाठी उद्या, गुरुवारी (१५ जानेवारी २०२६) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही शहरांतील मतदारांना शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी भाजप-महायुतीला कौल देण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या अस्मितेचा उल्लेख करत पाटील म्हणाले की, पुण्याचा वारसा जपत शहराला आधुनिकतेच्या शिखरावर नेण्यासाठी भाजप वचनबद्ध आहे. पुण्याच्या उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून ‘कमळा’ला मतदान करावे, असे आवाहन पाटील यांनी पुणेकरांना केले आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, कोल्हापूर ही केवळ ऐतिहासिक नगरी नसून आपल्या स्वाभिमानाचे केंद्र आहे. शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी आता बदलाची गरज आहे. त्यांनी कोल्हापूरकरांना धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ या महायुतीच्या चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
सांगलीच्या विकासाचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांच्या प्रगतीचा ‘त्रिवेणी संगम’ साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहराच्या गतिमान विकासासाठी मतदारांनी ‘कमळ’ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाला आपले अमूल्य मत द्यावे, अशी विनंती पाटील यांनी केली.
उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.