वस्ती भागातील लेकी-सुनांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच खरा पुरस्कार – नामदार चंद्रकांत पाटील
पुणे : कोथरूड मतदारसंघात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून गरोदर मातांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सुखदा’ या उपक्रमाच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून गेल्या एका वर्षात ९०० हून अधिक लेकींचे बाळंतपण ‘सुखदा’च्या छायेखाली सुखरूप आणि यशस्वीपणे पार पडले, ही बाब अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोथरूड हा केवळ मतदारसंघ नाही, तर माझं कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेणं हेच माझं कर्तव्य आहे. याच भावनेतून मानसी, सुखदा, सुकन्या समृद्धी योजना यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. वस्ती भागातील लेकी-सुनांचे बाळंतपण सुखरूप पार पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आणि आनंद, हाच समाजसेवेचा खरा पुरस्कार आहे. समाजातून मिळणारे हे समाधान मला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देते, असे पाटील यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या संचालिका स्मिता पाटील, तशिषा पाटील, धनश्री चितळे, सुरेखा जगताप, योग शिक्षिका मुग्धा भागवत, छाया मारणे, डॉ. संदीप बुटाला, नितीन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने माता-बालके उपस्थित होती.