मी माझं कर्तव्य बजावलंय, तुम्हीही घराबाहेर पडा आणि मतदान करा! – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी आज सकाळी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला. आपलं एक मत योग्य नेतृत्व निवडण्यासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत मोलाचे आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, आजचा दिवस आपल्या शहराच्या भवितव्याचा निर्णय घेणारा महत्त्वाचा दिवस आहे. मी माझं कर्तव्य पार पाडलंय. प्रत्येक सुजाण नागरिकाने जबाबदार नागरिक म्हणून घराबाहेर पडावे आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे. आपले एक मत प्रभागाच्या विकासाला दिशा देणारे आणि शहराच्या प्रगतीचा पाया घालणारे ठरणार आहे, असे नमूद करत त्यांनी लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला आहे.