४७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि अचूक अंदाज; मुंबई निकालाबाबत मंत्री चंद्रकांत पाटलांचा शब्द खरा ठरला
मुंबई : मुंबईच्या राजकारणात सध्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय कौशल्याची आणि अनुभवाची जोरदार चर्चा सुरू आहे. राजकारण आणि समाजकारणातील तब्बल ४७ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाबाबत जो अंदाज वर्तवला होता, तो अखेर तंतोतंत खरा ठरला आहे.
मुंबई महापालिकेचे भाकीत वर्तवायचं झालं तर 90 जागा या भाजपाला मिळतील तर 40 जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील, असा माझा अंदाज असल्याचे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये 165 पैकी 115 जागा भाजप निश्चितपणे जिंकणार आहे, असा अंदाज देखील पाटील यांनी वर्तवत, ठाकरेंना मुंबईत सत्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबई, पुणे यांच्यासह सहा नगरपालिकेच्या निकालाबाबत मी आकडेवारी तुम्हाला देऊ शकतो. माझ्या भाकितांचा इतिहास आहे की एखाद अर्धा निकाल इकडे तिकडे होतो मात्र बहुतांश भाकीत खरी ठरतात, असे पाटील यांनी म्हटले होते.
निवडणुकीच्या रणधुमाळीत चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील राजकीय समीकरणांचा अभ्यास करून महायुतीच्या यशाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला होता. निकालाअंती मुंबईत महायुतीची सरशी झाल्याने त्यांच्या राजकीय अनुभवाची आणि सूक्ष्म नियोजनाची आता राजकीय वर्तुळात सर्वत्र प्रशंसा होत आहे. चंद्रकांत पाटील यांचा हा ‘राजकीय तर्क’ अचूक ठरल्याने भाजप आणि महायुतीमधील त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.