पुणे महापालिकेतील विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; लोकाभिमुख कारभारासाठी देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शन

12

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्याच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या गौरव सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महानगरपालिकेत लोकाभिमुख, पारदर्शक आणि विकासाभिमुख कामकाज कसे करावे याबाबत फडणवीसांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. पुणेकरांनी दिलेला जनादेश हा सत्तेचा माज मिरविण्यासाठा नाही तर जबाबदारी उचलण्यासाठी आहे. महापालिका हा व्यवसाय नाही, कमिशनचा धंदा नाही. त्यामुळे तुम्ही गैरप्रकार, उन्माद केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात फडणवीस यांनी नगरसेवकांना थेट इशाराच दिला.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर पुणेकरांनी मतदानाच्या माध्यमातून विश्वास दाखवला आहे. जर आपण व्यवस्थित काम न केल्यास हा विश्वास क्षणात लाटेसारखा ओसरून जाऊ शकतो. त्यामुळे जनतेची कामे करा आणि विश्वास सार्थ ठरवा, असे फडणवीस म्हणाले. तुमची प्रतिमा म्हणजे भाजपची प्रतिमा आहे. एका व्यक्तीचा गैरप्रकार संपूर्ण पक्षाला बदनाम करतो. त्यामुळे कुणी कितिही मोठा असला तरी गैरकारभार चालणार नाही. प्रतिमा हेच राजकारणातील सर्वात मोठे भांडवल आहे. त्याला तडा जाऊ देऊ नका, असा मोलाचा सल्ला फडणवीसांनी दिला.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, हेमंत रासने यांच्यासह भाजपाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.